टिटवाळा : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या औचित्याने आज टिटवाळ्यात “रन फॉर युनिटी” (मॅरेथॉन) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कल्याण तालुका पोलिस ठाणे (ग्रामीण) यांच्या वतीने आयोजित या मॅरेथॉनमध्ये एकता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सकाळी नेमक्या साडेसात वाजता वाजपेयी चौक येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. मातादी मंदिर रोड मार्गे गणपती मंदिर चौक येथे ही शर्यत संपन्न झाली. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नारा देत तरुण, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने धाव घेतली. परिसरात ‘भारत माता की जय’ आणि ‘एकता झिंदाबाद’च्या घोषणा दुमदुमल्या.
पोलिस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने कार्यक्रमाची काटेकोर तयारी केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय पथकांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत होते.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना देशाच्या एकात्मतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. “एकता आणि अखंडता हीच खरी भारताची शक्ती आहे” असा संदेश या धावस्पर्धेतून देण्यात आला.
रन फॉर युनिटी मॅरेथॉनमुळे आज टिटवाळ्याचे वातावरण देशभक्तीच्या उत्साहाने भारावले होते. पोलिस ठाण्याच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेबद्दल जागरूकता निर्माण झाली असून हा उपक्रम सर्वांच्या मनात देशप्रेमाची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला.
डॉ.डी.एस.स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, अनमोल मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण आणि अनिल लाड उपविभागीय पोलीस अधीकारी मुरबाड विभाग,यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज गिरी पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या नियोजनाखाली तसेच कल्याण तालुका पोलीस ठाणे टिटवाळा येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.













Leave a Reply