बनेलीतील बेपत्ता ११ वर्षीय शुभम अखेर सुखरूप; पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रयात सापडला

Img 20251223 wa0007

टिटवाळा, वार्ताहर :

टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील बनेली परिसरात बेपत्ता झालेला ११ वर्षीय शुभम कुमार अर्जुन जयस्वाल अखेर पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा येथे सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तब्बल दीड दिवस चाललेल्या अथक शोधमोहीमीनंतर हा महत्त्वपूर्ण यशस्वी शोध लागला.

बनेली येथील गुप्ता चाळ परिसरात राहणारा शुभम सोमवारी (दि. २२ डिसेंबर २०२५) सायंकाळी साडेसहा वाजता भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र बराच वेळ लोटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींनी परिसरात कसून शोध घेतला; तरीही तो मिळून न आल्याने अखेर त्याचे भाऊ संदीप अर्जुन जयस्वाल यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली.

पोलीस प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संभाव्य मार्गांवर पथके पाठवणे, रेल्वे स्थानकांवर माहिती संकलन करणे तसेच विविध ठिकाणी चौकशी अशी व्यापक शोधमोहीम राबविली. या कारवाईला गती देताना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि मुरबाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सलग दीड दिवस अहोरात्र परिश्रम घेत संभाव्य प्रत्येक दुव्याचा मागोवा घेतला. तपासाअंती शुभम पश्चिम रेल्वे मार्गावरील बांद्रा परिसरात  असल्याची  माहिती काल रात्री उशिरा मिळताच पथकाने तात्काळ हालचाल करून त्याला सुरक्षित ताब्यात घेतले.

शुभम सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांचा आनंद अनावर झाला असून, परिसरातील नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले. या प्रकरणात वेळेत हालचाल, समन्वय आणि व्यापक शोधयंत्रणा यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा घटनांमध्ये तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले असून, बालकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवर्जून सुचविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *