टिटवाळा पूर्वेत नव्या रस्त्यालाच कचर्‍याचा ग्रहण; स्त्यावर ओला-सुका कचरा फेकला जात असल्याने दुर्गंधीचा कहर

Whatsapp image 2026 02 17 at 4.02.20 pm (1)

अमृतसिद्धी परिसर सुशोभीकरण करण्यात यावा – अ‍ॅड. जितेंद्र जोशी यांची मागणी

टिटवाळा, वार्ताहर : अजय शेलार 

टिटवाळा पूर्वेतील अमृत सिद्धी सोसायटी परिसरात नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था अवघ्या काही दिवसांत चिंताजनक झाली आहे. सोसायटीकडील रहिवासी नियमितपणे घंटागाडीत कचरा देत असताना, शेजारील बैठ्या घरांपर्यंत कचरा गोळा करणारी घंटागाडी पोहोचत नसल्याने त्या भागातील काही रहिवासी ओला व सुका कचरा सर्रास रस्त्यावरच टाकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी नव्याने डांबरीकरण झालेला रस्ता कचर्‍याच्या ढिगांनी झाकला जाऊन परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. स्थानिक रहिवासी अमिताभ सारंग यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, सोसायटीतून कचरा नियमितपणे घंटागाडीत दिला जातो; मात्र शेजारील बैठ्या घरांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते. ओल्या कचर्‍यामुळे चिखल, सडलेले अन्न आणि सांडपाणी रस्त्यावर पसरते, तर त्यात उंदीर, घुशी, कुत्री आणि मांजरी कचरा उकरून आणखी दुर्दशा करतात. परिणामी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवीन रस्ता तयार करून विकासाचे चित्र उभे केले असले तरी कचरा व्यवस्थापनातील ढिलाईमुळे तोच रस्ता आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दुर्गंधीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिक प्रशासनाने बैठ्या घरांपर्यंत नियमित घंटागाडीची व्यवस्था करावी, कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच परिसरात सीसीटीव्ही किंवा सूचना फलक लावून कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. अन्यथा नव्या रस्त्याच्या विकासकामावर कचर्‍याची सावली कायम राहणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आता प्रश्न असा की, स्वच्छतेच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दरी प्रशासन कधी भरून काढणार? अमृत सिद्धी सोसायटी परिसरातील ही समस्या तातडीने सोडवून स्वच्छतेचा खरा अर्थ दाखवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे.तर याबाबत येथील जागरूक नागरिक अ‍ॅड. जितेंद्र जोशी यांनी महापालिकेचे घन कचरा व सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपयुक्त कोकरे यांना मांडा पूर्व येथील अमृतसिद्धी रोडवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने सांगत अनेक रहिवाशांकडून नियमितपणे कचरा टाकला जातो. स्वच्छता अधिकारी वेळोवेळी कचरा उचलून परिसर स्वच्छ करतात; मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेथे कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. हे रोजचेच चित्र बनले आहे.
सदर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे विकासकामे करून रस्ते तयार केले जात असताना दुसरीकडे कचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे तेच रस्ते अस्वच्छतेच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ साफसफाई करून प्रश्न सुटत नाही, तर जनजागृती, नियमित देखरेख, दंडात्मक कारवाई आणि पर्यायी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता ‘अ’ प्रभाग प्रशासन आणि घनकचरा विभाग या दोन्ही भागातील समस्येकडे किती गांभीर्याने पाहतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्वच्छ शहराच्या दाव्यांना खरे ठरवायचे असेल, तर मृत सिद्धी सोसायटी परिसर आणि अमृतसिद्धी रोडवरील कचऱ्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *