संशयाच्या छायेत पत्नीची हत्या; नाशिकमध्ये जाऊन पतीची कबुली, कल्याण हादरले

कल्याण : रितेश कांबळे  (क्राईम रिपोर्टर)

कल्याण : कल्याणमधील उंबर्डे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपी स्वतः नाशिकला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल भुतकर असे आरोपी पतीचे नाव असून अर्चना भुतकर असे मृत महिलेचे नाव आहे. दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. विशालला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेच्या दिवशी विशाल भुतकर हा कल्याणमधील उंबर्डे येथील अर्चनाच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर संतापात झाले आणि रागाच्या भरात विशालने अर्चनाचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर विशाल घटनास्थळावरून पळून गेला आणि थेट नाशिकला त्याच्या भावाकडे पोहोचला. नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर विशालने आपल्या भावाला संपूर्ण घटना सांगितली. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन भावाने त्याला नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. तेथे विशालने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. सुरुवातीला पोलिसांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र सत्यता पडताळून पाहण्यासाठी नाशिक पोलिसांनी तत्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

त्यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने दिलेल्या पत्त्यावर, उंबर्डे परिसरातील घरात पोहोचले. घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना अर्चना भुतकर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची खात्री झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी विशाल भुतकर याला ताब्यात घेतले. विशाल आणि अर्चना या दाम्पत्याला दोन मुले असून त्यापैकी एक मुलगा विशालसोबत राहत होता, तर दुसरा मुलगा अर्चनाच्या आईकडे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने अनेकांना धक्का बसला आहे.दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी आरोपी विशाल भुतकर याला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *