गणेश प्रतिमा चौक हा वासुंद्रीकडे, रेल्वे स्थानकाकडे पुढे जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या एकमेव मार्गावर आठवडी बाजारामुळे दर मंगळवारी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. शाळेच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रेलचेल असताना रुग्णवाहिकाही या गर्दीत अडकून पडत असल्याच्या घटना घडल्या. परिणामी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता.
स्थानिकांच्या मते, काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली हा बाजार सुरू असल्याची चर्चा रंगत होती. परराज्यातून आलेल्या फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकृत दुकानदारांचा व्यवसाय कोलमडत असल्याची नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. अनियंत्रित गर्दी, अस्वच्छता आणि अन्नपदार्थांच्या अनधिकृत विक्रीमुळे येथील ग्रामस्थ , स्थानिक रहिवाशी यांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत असल्याची भीतीही व्यक्त होत होती. याशिवाय गर्दीचा फायदा घेत मोबाईल, रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या तक्रारीही पुढे आल्या होत्या.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण व फेरीवाला पथकाने संयुक्त मोहिम राबवत रस्त्यावर उभारलेले स्टॉल्स, हातगाड्या आणि शेड्स हटवून मार्ग मोकळा केला. कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले असले, तरी प्रशासनाने ठाम भूमिका घेत अंमलबजावणी केली. कारवाईनंतर वाहतुकीची स्थिती काही प्रमाणात सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पूर्वेकडे बनेली रोड , मातादी मंदिर या ठिकाणी देखील अशीच कारवाई करण्यात आली .
प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढे कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल. रखडलेल्या रिंगरूटचा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा अतिक्रमणाचे सावट दाटू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरूपी शिस्त प्रस्थापित करणारी ठरावी, अशी अपेक्षा टिटवाळाकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे मंगळवार बाजाराबरोबरच आता याच वासुंद्री रोडवर भरत असलेला रविवारच्या अनधिकृत बाजारावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल का ? याची नागरिक प्रतीक्षा आकारत आहेत .
Leave a Reply