कल्याण / मोहोने : संतोष निरभवणे
अखंड महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे आगमन मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात २७ ऑगस्ट रोजी झाले. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोयल यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे आश्वासन दिले होते की गणरायाच्या आगमनापूर्वी केडीएमसी क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती होईल. मात्र वास्तव पाहता केडीएमसी हद्दीतल्या अ प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या मोहने शहरातील रस्ते अजूनही खड्डेमय असून चाळण झालेल्या या रस्त्यांतूनच बाप्पाचे स्वागत झाले.
दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जनही नागरिकांना याच खड्डेमय रस्त्यांवरून करावे लागले. पुढील काही दिवसांत पाच व दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जनही या रस्त्यांतूनच करावे लागणार असल्याने भाविक त्रस्त झाले आहेत. भक्तांना वाजतगाजत मूर्ती विसर्जनासाठी जाताना तारेवरची कसरत करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एका बाजूला आयुक्तांनी खड्डे बुजवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती केल्याचे सांगितले जात असताना मोहने शहर मात्र यापासून वंचित का राहिले, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. “गणरायाच्या विसर्जनापूर्वी मोहने शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून क्षेत्र खड्डेमुक्त करावे आणि गणरायाचा आशीर्वाद घ्यावा,” अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













Leave a Reply