MD News : निलेश कासट – पालघर
कोळी मल्हार समाजाच्या अस्मितेचा जागर: राज्यव्यापी संमेलन सातिवलीत उत्साहात संपन्न
पालघर तालुक्यातील सातिवली येथे कोळी मल्हार समाजाच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा जागर करणारे 6वे कोळी मल्हार राज्यव्यापी संमेलन पारंपरिक थाटात आणि उत्साहात पार पडले. माजी आमदार महादेव घाटाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाची सुरुवात पारंपरिक वाद्य आणि नृत्याच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली.
संमेलनात राज्यभरातून कोळी मल्हार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांमध्ये आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील, मोहन गुहे, राजेश तारवी, तुकाराम माळी, ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास बेलकर यांचा समावेश होता.
समाजाच्या भविष्यासाठी ठोस चर्चा
संमेलनात समाजाच्या सद्यस्थिती, भविष्यातील दिशा आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजाच्या संघटित बांधणीवर भर देण्यात आला.
अध्यक्ष महादेव घाटाळ यांनी समाजाच्या एकतेवर भाष्य करताना सांगितले, “कोळी मल्हार समाजाची संस्कृती, बोलीभाषा, वाद्यसंस्कृती आणि धार्मिक परंपरा यांचे दस्तऐवजीकरण करणे काळाची गरज आहे. राज्यस्तरीय समिती स्थापन करून समाजहितासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.”
आमदार विलास तरे यांनी समाजाच्या अस्मितेचा जागर करण्यासाठी अशा संमेलनांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “तरुण पिढीने या संमेलनेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.”
माजी आमदार राजेश पाटील यांनी समाजाच्या ओळखीवर भर देत स्पष्ट केले, “समाजाची ओळख ‘मल्हार कोळी’ नव्हे, तर ‘कोळी मल्हार’ या नावाने प्रस्थापित झाली पाहिजे. समाजाची तीन लाखांहून अधिक लोकसंख्या अधिकृत नोंदणीत यायला हवी. तसेच वाद्यसंस्कृती, बोलीभाषा आणि सांस्कृतिक ठेवा जतन करण्यावर भर द्यायला हवा.”
सांस्कृतिक दस्तऐवजीकरणाची गरज
संमेलनात सुनील झळके यांनी कोळी मल्हार समाजाच्या संस्कृतीवर आधारित ग्रंथ तयार करण्याची संकल्पना मांडली, तर अंकुश देसले यांनी समाजाच्या भविष्यविषयक मार्गदर्शन केले.
उल्लेखनीय मान्यवरांची उपस्थिती
या संमेलनात मोहन गुहे, अरुण कदम, संजय भुयाळ, सीताराम माळी, चंद्रकांत घाटाळ, रमेश कुंभारे, स्नेहलता सातवी, सुनंदा बेलकर, नीता काटकर, राजश्री पाटील, विष्णू जाधव, दिनेश तारवी, तुकाराम घाटाळ, अनंत घाटाळ, अभिजीत पिलेना, प्रदीप तारवी, गुरुनाथ लहांगे, प्रशांत सातवी, रामू भोईर, गणेश बोंबाडे, निलेश कासट, माधव तल्हा, कृष्णा वारंगडे, नितीन बोंबाडे, अनंता पुंजारा, सुधीर भोईर, प्रकाश वरखंडा, राजू दळवी, कृष्णा जाधव, रामदास हरवटे, अविनाश मातेरा, सुनील गायकवाड, शिवाजी भोवरे, रज्जू सातवी आदी मान्यवर उपस्थित होते.
हे संमेलन कोळी मल्हार समाजाच्या एकतेचे आणि सांस्कृतिक जाणीवांचे प्रतीक ठरले. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी हे संमेलन नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.













Leave a Reply