खडवलीतील इ-प्लॅनेट स्कूलमध्ये पर्यावरण आणि संविधानाचा जागर — जनता हित फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

Whatsapp image 2026 01 31 at 9.34.41 pm

टिटवाळा, वार्ताहर : कल्याण तालुक्यातील खडवली येथील इ-प्लॅनेट स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची ठसठशीत किनार लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी कार्यक्रम रंगत गेला.

या प्रसंगी जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे सचिव नियाज शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. झाडांचे संगोपन, संवर्धन आणि दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी कशा अंगीकाराव्यात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती देत संविधानिक मूल्यांची जपणूक ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाच्या निमित्ताने जनता हित फाउंडेशनतर्फे शाळेतील सर्व शिक्षकवर्गाला वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांची जपणूक यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. यावेळी इ-प्लॅनेट स्कूलचे मुख्याध्यापक मोहम्मद अली शेख तसेच डायरेक्टर मोहम्मद आरिफ शेख यांनी रितेश कांबळे आणि नियाज शेख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढली असून संविधानिक मूल्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांचे स्वागत करत उपस्थित शिक्षकवर्ग आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *