टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील मांडा–टिटवाळा परिसरात सांडपाणी वाहून नेणारा प्रमुख नाला पूर्णतः तुंबल्याने नागरिकांचे दैनंदिन जगणे त्रस्त झाले आहे. रेल्स्था नकाजवळील सुमुख सोसायटी परिसरातून जाणाऱ्या या नाल्यात प्लास्टिक बाटल्या, कचरा व गाळ यांचा प्रचंड साठा साचल्याने पाणी अनेक ठिकाणी अडून राहिले आहे. परिणामी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास वाढत चालल्याने आरोग्यविषयक गंभीर धोका निर्माण झाला आहे.
साचलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता वाढली असून मांडा (पूर्व) भागातील सांडपाणी नैसर्गिक प्रवाहाने पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती अधिकच धोकादायक ठरू शकते, अशी ठाम चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. वेळेत उपाय न झाल्यास पाणी तुंबून परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते व कायदेविषयक सल्लागार अॅड. जितेंद्र जोशी (टिटवाळा) यांनी प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. नाल्याची त्वरित साफसफाई, साचलेला कचरा उचलणे आणि नियमित देखभाल यांची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, अशी त्यांनी जोरदार मागणी केली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याने संबंधित यंत्रणांनी विलंब न करता कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या भागातील आरोग्य निरीक्षक कराळे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र तक्रार असो वा नसो, प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली जाईल आणि समस्या आढळल्यास योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.













Leave a Reply