“वर्दीतलाही एक माणूस असतो, संवेदनशील आणि प्रेरणादायी!
टिटवाळा : अजय शेलार
नाशिक जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातल्या एका तरुणाने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे आयटीआय मधुन इलेक्ट्रीकलटेकनीशन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक म्हणून स्थान मिळवले आहे. आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या तरुणाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच भावनिकही ठरला, कारण या यशाचा एक छोटासा पण हृदयस्पर्शी क्षण टिटवाळा पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला.
नोकरीसंदर्भातील पोलीस सत्यापन प्रक्रियेसाठी हा युवक काही काळ राहत असलेल्या कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात परत आला होता.वेरीफिकेशनची पोलीस ठाण्यातील औपचारिक प्रक्रिया संपल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी नेहमीप्रमाणे औपचारिकतेत न अडकता त्या तरुणाशी संवाद साधला. बोलता बोलता जेव्हा त्यांना कळले की हा तरुण इस्रोसारख्या प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय अभिमानाच्या संस्थेत निवडला गेला आहे, तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेत त्याचे कौतुक केले.
गिरी यांनी त्याला मिठाई भरवत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात त्या युवकाचा सन्मान केला. या प्रसंगी क्षणभर पोलीस ठाण्याचे वातावरण आनंद, अभिमान आणि आपुलकीने भारले.
सामान्यतः लोकांच्या मनात पोलिसांविषयी भीती, तणाव किंवा कठोरतेची भावना असते. मात्र या घटनेने “वर्दीतला माणूसही माणूसच असतो, संवेदनशील, प्रेरणादायी आणि समाजाच्या यशात मनापासून आनंद मानणारा” हा मानवी पैलू पुन्हा एकदा उजेडात आला.
या घटनेमुळे केवळ इस्रोत निवड झालेल्या तरुणालाच नव्हे, तर त्याच्या गावकऱ्यांनाही अभिमान वाटला आहे. “आपल्या तालुक्यातील एक मुलगा आता इस्रोमध्ये!” हे वाक्य आज त्या खेड्यातील प्रत्येकाच्या ओठांवर आहे. तर टिटवाळा पोलिसांच्या या मनमिळाऊ कृतीने पोलीस दलाची प्रतिमा अधिक उजळली आहे.
“वर्दीतला माणूस केवळ शिस्तीचा प्रतीक नाही, तर प्रेरणेचंही प्रतीक आहे,” असं म्हणत टिटवाळा पोलीस ठाण्यातील या लहानशा प्रसंगाने दाखवुन दिलं की संवेदनशीलता आणि निखळ मानवी भावनांना वर्दीची बंधने नसतात.
















Leave a Reply