निवडणूक काळाचा फायदा घेत मोकळ्या जमिनींवर अतिक्रमण, तोड कारवाईनंतरही पुन्हा उभारणी; संपूर्ण परिसरात भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण
टिटवाळा , प्रतिनिधी : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभागातील टिटवाळा, बल्याणी, मांडा, बनेली, वडवली, वासुंद्री, मोहने, आंबिवली परिसर सध्या अक्षरशः भूमाफियांच्या विळख्यात सापडल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपासून या संपूर्ण पट्ट्यात बेकायदा बांधकामांची सुनामी उसळली असून, मोकळ्या जागा, डोंगर-टेकड्या, हरितपट्टे आणि शासकीय भूभाग दिवसाढवळ्या अतिक्रमणाखाली जात आहेत. चाळी, खोल्या, पत्र्याचे शेड, स्लॅब टाकलेली बांधकामे, तात्पुरत्या संरचना उभ्या राहत असून शहराच्या नियोजनबद्ध विकासावर थेट घाला घालण्याचे काम उघडपणे सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेने यापूर्वी कारवाई करून जमीनदोस्त केलेली बेकायदा बांधकामेच पुन्हा नव्याने उभारली जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे. तोड कारवाईनंतर काही दिवस शांतता आणि त्यानंतर पुन्हा नव्याने बांधकाम – असा ठराविक आणि योजनाबद्ध ‘पॅटर्न’च जणू भूमाफियांनी विकसित केला आहे. त्यामुळे प्रशासनाची कारवाई ही केवळ कागदापुरती आणि औपचारिकतेपुरतीच मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेनंतर सर्वाधिक हरितपट्टा असलेला भूभाग म्हणून ओळख असलेला टिटवाळा परिसर आज बेकायदा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकत चालला आहे. नैसर्गिक वनराई, मोकळी जमीन आणि पर्यावरणीय संपदा झपाट्याने नष्ट होत असून, भविष्यात पूरस्थिती, पाणी साचणे, आरोग्य समस्या, नागरी सुविधांवरील ताण आणि शहराच्या पायाभूत व्यवस्थेचे मोठे संकट उभे राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणीय समतोल ढासळत चालल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
याआधी टिटवाळा परिसरात बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई न केल्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी थेट एका साहाय्यक आयुक्ताला निलंबित करून नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही काळात परिसरात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहू दिले गेले नव्हते. सातत्यपूर्ण तपासणी, कडक कारवाई आणि प्रशासकीय दबावामुळे भूमाफिया काहीसे गप्प झाले होते. मात्र त्या अधिकाऱ्याची बदली होताच आणि निवडणूक रणधुमाळी सुरू होताच पुन्हा एकदा भूमाफियांचे जाळे सक्रिय झाल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत.
आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की, हिरव्या जाळ्या लावून, बांबूंच्या मचानावर, रातोरात स्लॅब टाकून, अगदी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांलगतही बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. काही ठिकाणी थेट वीज व पाणी कनेक्शन घेतले जात असून, वास्तव्यासाठी चाळी तयार केल्या जात आहेत. हे केवळ बांधकाम नसून, नियोजनबद्ध अतिक्रमण आणि बेकायदा वसाहतींची संघटित उभारणी सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, अ प्रभागातील बीट मुकादम, निरीक्षक यंत्रणा आणि प्रभाग प्रशासनाची प्रत्यक्ष उपस्थितीच परिसरात दिसून येत नाही. “तक्रारी केल्या जातात, अर्ज दिले जातात, पण कारवाई होत नाही. कागदावर कारवाई, प्रत्यक्षात भूमाफियांची मुक्त संचार,” अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच भूमाफियांचे धाडस वाढत असल्याचा थेट आरोप होत आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक संस्थांच्या आसपासही बिनदिक्कतपणे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. हिरव्या जाळ्यांनी झाकलेली इमारत, रातोरात उभारलेल्या संरचना, तात्पुरत्या साहित्यावर उभे केलेले ढाचे, सार्वजनिक रस्त्यालगत स्लॅब टाकलेली बांधकामे आणि चाळीच्या स्वरूपात सुरू असलेली उभारणी – हे सर्व प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. ही दृश्ये म्हणजे केवळ एखाद्या इमारतीचे चित्र नाही, तर संपूर्ण टिटवाळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांच्या साखळीचे जिवंत प्रतीक असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने कानाडोळा केल्याने अनेक दुर्घटना देखील घडल्याचे जिवंत उदाहरणे आहेत . तर दुसरीकडे चक्क काही प्रभागांत चक्क आयुक्तांच्या आदेशालाच न जुमानता बिनधास्तपणे बेकायदा बांधकामे चालू असल्याने आयुक्तांनाच दुसऱ्यांदा कारवाईसाठी आदेश काढावे लागल्याची नामुष्की ओढवली आहे .
जर वेळीच कठोर, सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि निर्भीड कारवाई झाली नाही, तर टिटवाळा, बल्याणी, मांडा, बनेली, वडवली, वासुंद्री, मोहने, आंबिवलीसह संपूर्ण परिसर बेकायदा चाळी, झोपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींनी गिळंकृत होण्याचा धोका अटळ आहे. आजची दुर्लक्षाची भूमिका उद्या शहरासाठी महाभयंकर संकट ठरू शकते, असा इशारा संतप्त नागरिक देत आहेत.
प्रशासन जागे होणार की भूमाफियांचे जाळे अधिक मजबूत होणार, हा प्रश्न आज संपूर्ण टिटवाळा परिसरात जळजळीत चर्चेचा विषय ठरत आहे.













Leave a Reply