रहिवाशांच्या तक्रारीला यश
टिटवाळा : मांडा टिटवाळा परिसरातील विनायक आशिष अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत गाळ्यांविरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अखेर कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. रहिवाशांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर ही ठोस हालचाल करण्यात आली आहे. मांडा येथील भूमापन क्र. ३१ व ३२, हिस्सा क्र. १/३ व १/४ वर उभारलेल्या या इमारतीमध्ये मंजूर आराखड्याचे उल्लंघन करत विकासकाने १० अनधिकृत गाळे बांधले होते. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ही दुकाने पार्किंगच्या जागेत बेकायदेशीरपणे बांधून भाड्याने देण्यात आली होती आणि सोसायटीसाठी असलेले स्वच्छतागृहही तोडून रूममध्ये रूपांतरित करण्यात आले होते. रहिवाशांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात कारवाईसाठी स्थळ पाहणी, नोटीस देऊन पाडकाम, विकासकावर कायदेशीर कारवाई आणि सार्वजनिक जागेच्या अतिक्रमणाची तात्काळ दखल.चार प्रमुख मागण्या मांडल्या होत्या
या पार्श्वभूमीवर, महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २६० व २६७ (१) तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत सुनावणी आयोजित केली होती. सुनावणीस सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून उपस्थित होते. सुनावणीत बांधकामधारक महेश गोयल हे कोणतेही अधिकृत दस्तऐवज सादर करू शकले नाहीत. परिणामी, हे बांधकाम अनधिकृत ठरवण्यात आले असून, ५ गाळे आणि २ सदनिका १५ दिवसांच्या आत स्वतःहून हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, पोलिस बंदोबस्तात महानगरपालिका स्वतः कारवाई करणार असून, खर्च बांधकामधारकाकडून वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय, प्रकरणात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाचे कलम ५२, ५३ आणि महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३९७ (अ) अंतर्गत फौजदारी कारवाईही प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक रहिवाशांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित असून, इतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसाठीही इशारा ठरणार आहे.














Leave a Reply