अजय शेलार : पत्रकारितेतील भरीव योगदानासह सामाजिक क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत कल्याण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रविण आंबाजी आंब्रे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे ‘कोकणरत्न’ ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या भव्य आणि उत्साही पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
कोकणभूमीचे नाव विविध क्षेत्रांत उज्वल करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने ‘कोकणरत्न’ मानद पदवी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत पत्रकारिता, सामाजिक कार्य, साहित्य, कला आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, ज्येष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर, अभियानाचे सल्लागार दिलीप लाड, खजिनदार राजेंद्र सुर्वे, मुंबईचे अध्यक्ष धनंजय कुवेसकर, सुभाष राणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात प्रविण आंब्रे यांना ‘कोकणरत्न’ मानद पदवी बहाल करण्यात आली.
गेली अनेक वर्षे प्रविण आंब्रे हे पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन व कार्य करत आहेत. सध्या ते ‘कोकण वृत्तांत’ या न्यूज पोर्टलचे काम पाहत असून, यापूर्वी त्यांनी मुंबईतील नामांकित दैनिकांमध्ये बातमीदार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. राजकीय, सामाजिक आणि ग्रामीण प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी मांडलेली पत्रकारिता वाचकांच्या विश्वासार्हतेचा आधार ठरली आहे.
याशिवाय माजी खासदार सुधीर सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महानगर सफाई कर्मचारी संघ, महाराष्ट्रचे सल्लागार, शिवराज्य ब्रिगेडचे प्रदेश सचिव, भटके बहुरुपी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार, कोकण रहिवाशी मंडळाचे उपसचिव अशा विविध संस्थांमध्ये ते जबाबदारीने कार्यरत आहेत. समाजातील वंचित घटकांसाठी आवाज उठवणे, कोकणच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे आणि जनहिताचे विषय ठळकपणे मांडणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे गावचे सुपुत्र असलेल्या प्रविण आंब्रे यांच्या या सन्मानामुळे कल्याणसह संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ‘कोकणरत्न’ मानद पदवीमुळे त्यांच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीला नवे बळ मिळाले असून, कोकणच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे पुढे येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.













Leave a Reply