मातामंदिर परिसरात हरवलेली तीन वर्षांची चिमुरडी ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे सुखरूप पालकांच्या कुशीत

Whatsapp image 2026 02 13 at 3.09.02 pm

कल्याण तालुका पोलिसांची तत्पर धाव

 

टिटवाळा : अजय शेलार

माणसांच्या गर्दीत हरवणारे क्षण कधी कधी आयुष्यभराची वेदना बनतात. पण पोलिसांची जागरूकता, नागरिकांची संवेदनशीलता आणि तात्काळ कृती यामुळे आज एक कुटुंब मोठ्या अनर्थापासून वाचले. कल्याण तालुका पोलीस ठाणे हद्दीत मातामंदिर, बनेली रोड परिसरात आज दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अवघी तीन वर्षांची चिमुरडी रस्त्यावर एकटीच भटकताना आढळून आली.

डोळ्यांत भीती, आजूबाजूला अपरिचित चेहरे आणि उन्हात रडत फिरणारी ती लहानगी पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. महिला पोलीस अमलदारांनी प्रसंगावधान राखत त्या बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्यात आणले.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी त्वरित ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शोधमोहीम सुरू केली. टिटवाळा शहरातील विविध व्हॉट्सअॅप गटांवर चिमुरडीचा फोटो प्रसारित करत पालकांचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर दोन स्वतंत्र पथके तयार करून परिसरात प्रत्यक्ष चौकशीही सुरू करण्यात आली. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याची जाणीव ठेवून पोलीस यंत्रणा सज्ज झाली होती.

दरम्यान,मांडा येथील आंबेडकरनगर, येथील अक्षय राऊत या युवकाने पुढाकार घेत महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली. संबंधित बालिकेचे पालक दुबे कॉलेज, मातामंदिर, बनेली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांनी कळवली. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे शोधमोहीमेला निर्णायक दिशा मिळाली.

त्यानंतर या हरवलेल्या मुलीचे वडील आणि आई यांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. आवश्यक खातरजमा, ओळख पटविणे आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या ३ वर्षाच्या चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. लेकीला पुन्हा आपल्या कुशीत घेताना पालकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले; तर पोलिसांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसत होती. वेळेवर मिळालेली माहिती, सामाजिक माध्यमांचा सकारात्मक वापर आणि नागरिक–पोलीस यांच्यातील समन्वय यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनेमुळे ‘ऑपरेशन मुस्कान’ ही केवळ एक मोहीम नसून, हरवलेल्या हास्याला पुन्हा उजाळा देणारी संवेदनशील चळवळ असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रसंगी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *