ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री डॉ अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन
डोंबिवली : संदीप वैद्य
पुराणकाळातील स्रियांनी सहनशीलतेपुढे जाऊन सहनसिद्धी प्राप्त केल्याची उदाहरणे आहेत,आताही स्त्रीने सहनसिद्धीकडे जायला हवे,अन्याय सहन करणे म्हणजे सहनशीलता अजिबात नाही,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व कवयित्री डॉ अरूणा ढेरे यांनी मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टने मराठी भाषा दिन व महिला दिनानिमित्त आयोजित ‘गप्पांच्या’ कार्यक्रमात केले! भरपूर ऊन,डोंबिवलीतील अनेक कार्यक्रम,क्रिकेट मॅच असूनही साहित्यप्रेमी प्रेक्षकांनी ब्राह्मण सभेचे सभागृह पूर्ण भरले होते! प्रेक्षकांचा हा उदंड उत्साही प्रतिसाद सुखावणारा होता! स्त्री पुरूष मैत्र यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ ढेरे यांनी आपली ‘अनय’ही कविता सादर केली,अनयने जसा निरपेक्ष स्वीकार राधा व कृष्णाच्या मैत्रीचा केला,स्वामित्वाऐवजी सहिष्णुता दाखवली तशीच प्रत्येक नात्यात दुसर्यावरचा विश्वास व त्याला असलेल्या स्वतंत्र अवकाश जपण्याची सहिष्णुता दाखवली तर स्त्रीपुरूष नाते वेगळ्या उंचीवर पोहोचू शकते,असे अरूणाताईंनी सांगितले.
मराठी भाषा वाढवण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रमापलिकडे जाऊन साहित्य व वाचन स्वत: करून विद्यार्थ्यांना करायला प्रोत्साहन द्यायला हवे, साहित्याच्या उत्सवासाठी मोठे अ.भा संमेलन गरजेचे असले तरी विविध वाङमय प्रकारांवर छोटी संमेलने वर्षभर करायला हवीत,बोली भाषा महत्वाच्या आहेत पण व्यवहारासाठी प्रमाण भाषा हवी,असे विचार मराठी भाषा व साहित्य याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देताना अरूणाताईंनी मांडले. अरूणाताईंच्या विविध साहित्यातील स्त्री व्यक्तिरेखा व मराठी भाषा यावर मनोदयच्या समुपदेशक अदिती प्रभूघाटे कामत व मनोदयच्या विश्वस्त कवयित्री मेघना पाध्ये यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले व अरूणाताईंनी पण विविध उदाहरणे देऊन सविस्तर उत्तरे आपल्या ओघवत्या,मार्दवपूर्ण शैलीत दिली, दोन तास कसे संपले ते कळलेच नाही इतके सर्वजण रंगून गेले होते. कार्यक्रमाची सुरूवात रोहित पाध्ये,सायली खेर परांजपे,गायत्री महाबळेश्वरकर यांनी मराठी अभिमानगीत गाऊन केली.नंतर मनोदय ट्रस्टचे अध्यक्ष मानसोपचार तज्ज्ञ डॉ अद्वैत पाध्ये यांनी प्रास्ताविक करताना ‘भाषा संवर्धन,मन संवर्धन’हे सूत्र समजावले व नंतर डॉ अरूणा ढेरे यांचे यथोचित स्वागत केले! गप्पांच्या शेवटी पुढील योजनांबाबत बोलताना डॉ ढेरे यांनी आपल्या वडिलाकडील हजारो पुस्तके,संदर्भग्रंथ याचा ठेवा जतन करण्यासाठी व पुढच्या पिढ्यांना उपयोग होण्यासाठी डिजिटायझेशनचे काम “डॉ रा चि ढेरे संस्कृती संशोधन मंडळा’मार्फत हाती घेतले आहे,ज्यास निधीची आवश्यकता आहे त्यामुळे साहित्यप्रेमींनी देणग्या देण्याचे आवाहन केले!
















Leave a Reply