गाडी हळू चालव म्हणताच संतापाचा स्फोट; टिटवाळ्यात घरावर हल्ला, तिघे जखमी

titwala crime

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात किरकोळ कारणावरून उसळलेल्या संतापाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “गाडी हळू चालवा” अशी साधी सूचना दिल्याच्या रागातून पाच ते सहा जणांच्या टोळीने एका कुटुंबावर धाड टाकत घरात घुसून तोडफोड केली आणि कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते .मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते .

या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात क्षणात तणाव निर्माण झाला असून कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.टिटवाळा येथील आंबेडकर चौक परिसरातील आर. के. चाळ, राजेश्वरी बिल्डिंगजवळ ही घटना घडली. तक्रारदार झुल्फेकर अली अब्दुल्ला खान (वय ५०) हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशन व्यवसाय करतात. ३ मार्च रोजी ते आपल्या भावांसोबत घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल वेगात चालवत त्या परिसरातून जात होता. अरुंद रस्त्यामुळे आणि नागरिकांची वर्दळ असल्याने खान यांनी संबंधित तरुणाला गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला. मात्र या साध्या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वातावरण तापले. काही वेळातच हा वाद उग्र रूप धारण करणार असल्याचे स्पष्ट झाले.वादानंतर काही वेळाने संबंधित तरुण पुन्हा घटनास्थळी परतला; मात्र यावेळी तो एकटा नव्हता. त्याने आपल्या वडिलांसह आणखी काही साथीदारांना सोबत आणले होते. या टोळीने घटनास्थळी येताच शिवीगाळ करत संतापाचा उद्रेक केला आणि घरावर धाड टाकली. लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. दरम्यान तक्रारदार झुल्फेकर खान यांच्यावरही हल्ला चढवण्यात आला. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले तसेच तोंडावर जोरदार मारहाण झाल्याने त्यांचे दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या झटापटीत कुटुंबातील आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.घडलेला संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. परिसरातील नागरिकांनीही या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान, क्षुल्लक कारणांवरून वाढणारी आक्रमकता आणि त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती समाजासाठी चिंताजनक ठरत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. रस्त्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांत घरावर हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने सामाजिक सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे आणि समाजात संयमाची जाणीव रुजवणे, ही काळाची गरज असल्याची चर्चा टिटवाळा परिसरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *