टिटवाळ्यात नावाच्या उच्चारावरून भाजपाची ‘आढावा बैठक’ तापली

Img 1 1759652112506
भावी उमेदवारच विसरला माजी नगरसेवकाचे नाव 
टिटवाळा :  राजकारणात मत, मते आणि मतदार हे जितके महत्त्वाचे असतात तितकेच आता नावांचं महत्त्व वाढत चाललं आहे. कारण काल टिटवाळ्यात झालेल्या भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत ‘एक नाव’ चुकल्यामुळे चक्क बैठकीचा विषयच बदलला. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना एकत्र बोलावण्यात आलं होतं, मात्र चर्चा झाली ती संघटनेपेक्षा उच्चारांची आणि स्मरणशक्तीची!
भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षातील अनेक माजी आणि विद्यमान पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला वातावरण संघटनात्मक चर्चेचं आणि पुढील रणनीती ठरवण्याचं होतं. पण सभागृहातील शांतता तेव्हा मोडली, जेव्हा एका नवख्या आणि उमेदवारीसाठी ईच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्याने उत्साहात बोलताना एका ज्येष्ठ माजी पदाधिकाऱ्याचं नाव चुकीचं घेतलं. नाव चुकल्यावर चेहऱ्यावरचं हास्य काही क्षणातच नाराजीच्या छटांमध्ये बदललं. अनुभवी माजी पदाधिकारी संतापाने थोडेसे अस्वस्थ झाले, आणि एक क्षणभर सभा  तणावपूर्ण वाटू लागली.  सूर जरा कडक झाला, आणि  “इतकी वर्षं पक्षासाठी झटूनही नाव लक्षात राहत नाही ? असे काहीसे भाव त्या चेहर्यावर होते .
तेवढ्यात दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याने मध्यस्थीच्या आवेशात बोलताना थोडं जास्तच थेट विधान करून टाकलं – “जे नेहमी पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्यांची नावं कोण विसरणार?”   इतकं झाल्यावर बैठकीचं वातावरण जरा ‘राजकीय’पेक्षा अधिकच व्यक्तीगत  झाल्याचे पाह्यला मिळाले . अशा स्वरूपात त्या क्षणाने संपूर्ण सभा व्यापली.
नंतर जिल्हाध्यक्षांनी विषयाला वळण देत सगळ्यांना शांत केलं आणि संघटनात्मक चर्चेकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं. मात्र, स्थानिक राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा मात्र वेगाने पसरली आहे. “भाजपच्या बैठकीत नाव चुकणं म्हणजे संघटनेच्या थरात भूकंप!” अशी कुजबुज आता सर्वत्र ऐकू येत आहे. हा सगळा आखो देखा हाल भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यांनी नावं न सांगण्याच्या अटीवरती पत्रकारांसमोर कथन केला. अनेक कार्यकर्त्यांच्या मते, “पक्षाच्या बैठकीत मतभेद होणं काही नवीन नाही, पण आता नावांवरूनही मतभेद सुरू झालेत, ही नव्या पिढीच्या राजकारणाची नवीन दिशा आहे.” तर काही जण विनोदाने म्हणतात, “आता पुढच्या बैठकीत पक्षाने ‘नामस्मरण कार्यशाळा’ घ्यावी लागेल!”
या घटनेतून एक चित्र मात्र स्पष्ट झालं — पक्षात मेहनतीपेक्षा उपस्थिती, आणि उपस्थितीपेक्षा ओळख, या क्रमानेच आजची राजकीय स्पर्धा ठरते आहे. टिटवाळ्यातील ही घटना तात्पुरती असली तरी, राजकीय पातळीवर ‘नाव’ आणि ‘मान’ यांचं नातं किती गुंतागुंतीचं आणि संवेदनशील आहे, हे मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झालं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची एकजूट आणि समन्वय गरजेचा असताना, अशा छोट्याशा प्रसंगाने मोठं चित्र डळमळीत होऊ नये, अशी अपेक्षा आता कार्यकर्त्यांतूनच व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *