ठाणे ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभागाची मागणी; गृहराज्यमंत्र्यांकडे निवेदन
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्रीदर्जा कॅप्टन आशिष दामले यांनी घेतली दखल
टिटवाळा , वार्ताहर : ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस हद्दीतील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होत असलेला विकास आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहर अध्यक्ष तथा जनसेवा सामाजिक कार्यसंस्था (२००८) चे संस्थापक अॅड. जितेंद्र जोशी यांनी मांडली होती. याबाबत मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. तर या मागणीची दखल परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्रीदर्जा कॅप्टन आशिष आनंद दामले यांनी देखील घेतली असून त्यांनी याबाबत राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांना पत्र पाठवून आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस हद्दीत मुरबाड पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, वासिंद पोलीस ठाणे, किन्हवली पोलीस ठाणे, कसारा पोलीस ठाणे, टोकावडा पोलीस ठाणे,पडघा पोलीस ठाणे,भिवंडी ग्रामीण पोलीस ठाणे,गणेशपुरी पोलीस ठाणे,कुळगाव-बदलापूर पोलीस ठाणे, कल्याण तालुका पोलिस ठाणे – टिटवाळा अशी ११ पोलिस ठाणे येतात या भागांमध्ये वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक-नागरी विकासामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. या सर्व भागांचा समावेश असलेल्या ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत एकूण ११ पोलीस ठाणे कार्यरत असले तरी स्वतंत्र वाहतूक विभाग नसल्याने वाहतूक व्यवस्थापनावर मोठा ताण येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ टिटवाळा शहर अध्यक्ष तथा जनसेवा सामाजिक कार्यसंस्था (२००८) चे संस्थापक अॅड. जितेंद्र जोशी यांनी या संदर्भात मागणी मांडली होती. या मागणीस पाठिंबा देत जनसेवा सामाजिक कार्यसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर भोईर तसेच पदाधिकारी किरण पंडित यांनी मंत्रालयात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी गृहराज्यमंत्र्यांना टिटवाळा येथील महागणपतीची प्रतिमाही भेट देण्यात आली.
ठाणे ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करून आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहनचालकांना होणारी गैरसोय दूर करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीमुळे ठाणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
















Leave a Reply